पू गुरुदेव रानडे ह्यांच्या अधिकारी शिष्या, निंबर्गी संप्रदायाच्या ज्येष्ठ अभ्यासक, मार्गदर्शक असणाऱ्या पद्माताई कुलकर्णी ( वय ९२) ह्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९८० मध्ये गुरुदेव रा. द. रानडे स्मृती व्याख्यानमालेत *आत्मानंद आणि त्याचे जीवनातील स्थान* ह्या विषयावर दिलेल्या दोन व्याख्यानांच्या ग्रंथरूपाने प्रसिध्द झालेल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वतीने कुलगुरु डॉ नितीन करमळकर ह्यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आली.
आपल्या मनोगतात डॉ करमळकर ह्यांनी आनंद म्हणजे काय ह्याचा सर्वांगानी केलेला विचार हे ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले आहे. प्रकाशनकामी प्रा डॉ अश्विनी (मीराताई) अविनाश जोग,सोलापूर तसेच डॉ दत्तात्रय कुटे,डॉ आदित्य अभ्यंकर आणि सहकारी ह्यांच्या सहयोगाविषयी आभार व्यक्त केले आहेत.
प्रस्तावनेत आत्मानंद हा इंद्रियजन्य सुखापेक्षा किंवा बौद्धिक समाधानापेक्षा निराळा आहे,तो खिरापती सारखा वाटता येत नाही किंवा तो रस्त्यावर पडलेला नाही त्यासाठी नामस्मरणाचे तेल घालून भक्तीची ज्योत प्रज्वलीत ठेवणे आवश्यक आहे असे पद्माताई कुलकर्णी ह्यांचे आग्रही प्रतिपादन आहे.
आनंद सर्वांनाच हवा आहे तसेच दुःख कोणालाही नको आहे पण संसार मुळातच दुःख बांदवडी असल्याने मिळणारा आनंद तात्पुरता जाणवतो. एखादा आवडता पदार्थ खाल्ल्याने अथवा सुंदर पुस्तक, संगीत वाचल्याने मिळणारा आनंद व्यक्तिगत तसेच सामूहिक असू शकतो पण त्याला मर्यादा आहेत.प्रत्येक क्रिया ही सुखासाठी केलेली नसली तरी तिचा उद्देश सुख प्राप्ती हाच असतो. सुख म्हणजे काय हे जाणून घेण्याचा अभ्यास,ह्या व्याख्यानाचा हेतू आहे आणि तो पाश्चात्य तसेच भारतीय तत्वज्ञांच्या मतांचा आधार घेत, उपनिषदांची प्रमाणे अभ्यासत आणि पू गुरुदेव रानडे ह्यांनी घेतलेल्या अनुभूतीची वाट समोर ठेवून, आत्मानंदाची संकल्पना, तिचे जीवनातील स्थानाची विस्तृत चर्चा पद्माताईंनी केली आहे.
प्रत्येकाची सुखाची व्याख्या भिन्न असू शकेल पण अध्यात्मिक आनंद हाच श्रेयस्कर आहे यावर सर्व तत्वज्ञांचे एकमत आहे. एखाद्या यंत्रात योग्य ठिकाणी खिळा बसविणे ह्यासाठी जसे ज्ञान आवश्यक असते तसेच खरे ज्ञान म्हणजे ईश्वरप्रचिती आहे असे तत्वज्ञ स्पिनोझा ह्यांचे मत पद्माताईंनी नोंदवले आहे.अध्यात्मिक आनंदाचा उल्लेख गीतेत अनेक ठिकाणी आला आहे. हर्षशोकरहित आणि आत्मज्ञानाने संपन्न असे स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगितले आहे.*ऐसा हरिखशोकरहितु|जो आत्मबोधभरितु|* (ज्ञानेश्वरी २.३००) हे वर्णन पाहायला मिळते.त्रिगुण सुखाच्या पलीकडे त्रिगुणातीत सुख असून ते सात्विक सुखाच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे पू गुरुदेवांचे मत होते आणि हे सुख आत्मदर्शनाने प्राप्त होते.*तरी आत्मसुखाचिया गोडिया| विटे जो कां सकळ विषया| तयाचे ठायी इंद्रिया| मानु नाही||* (४.१८७)आत्मज्ञानाचे हे लक्षण आहे.हाव नाहीशी होणे म्हणजे बावळटपणा नसून ती वस्तू प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य असूनही त्यांच्या मागे न लागणे हे आत्मानुभवी जाणतात.*देखे विषय हे तैसे|पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषे|*(२.३१३) असे संत विषयापासून अलिप्त राहतात हा दुबळेपणा नाही.
इंद्रियसुख व्यक्तिगत आहे, बौद्धिक सुख सामायिक तर अध्यात्मिक सुख मात्र सर्वांस देता येते.आनंद घ्या आणि आनंद द्या आणि कितीही दिला तरी तो कमी होत नाही म्हणून तो सर्वश्रेष्ठ आनंद संतांनी वाटला.*तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू| नका चरफडू घ्यारे तुम्ही|*
आत्मानंदाचे जीवनातील स्थान काय ह्याची चर्चा पद्माताईंनी दुसऱ्या व्याख्यानात केली आहे. आत्मानंदाचा ज्याला लाभ झाला आहे त्याला धीरोदात्तता प्राप्त होते आणि नित्य नवी संकटे आव्हाने पार करीत तो यशस्वी होतो. नशिबाचा फेरा फिरला तरी त्याचे सुखाचे माप भरलेले राहते. त्याचे वागणे, विचार हे इतरांच्या उन्नतीस कारणीभूत ठरतात.*जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती| देह कष्टविती परउपकारे|* आत्मानंदाची प्राप्ती हा परतत्व स्पर्श असून त्यातून *आता उरलो उपकारापुरता* अशी वृत्ती निर्माण होते.संतांनी सतत ढोंगीपणाचा धिक्कार केला असून आपला जीवन विषयक दृष्टिकोन शुष्क, तत्वज्ञान रडके,वैराग्याचा उदो उदो करणारे आणि भौतिक प्रगतीला आडकाठी करणारे आहेत हे संतांचे वरील आक्षेप चुकीचे आहेत असे पद्माताई आवर्जून सांगतात.
तत्वज्ञ स्पिनोझ ह्यांच्या मते कोणतेही सुख पायदळी तुडवणे असे नाही तर त्या आनंदाला विश्र्वाकार देणे, सुख दुसऱ्यांना द्यावे असे वाटणे म्हणजे ईश्वराच्या अधिक जवळ जाणे आहे. सुख ही कुणाची व्यक्तिगत मालमत्ता नसून ती आमजनांना खुली आहे असे स्पिनोझचे मत पुन्हा अधोरेखित केले आहे. श्रीमाउलींनी सुद्धा विश्वात्मक भाव अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. *आता विश्वात्मकु माझा| स्वामी श्रीनिवृत्तिराजा|*(१५.५९८)ही व्यापकता प्रकट केली आहे.
आत्मानंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या शुद्धतेची आवश्यकता आहे.*परी तेचि थारे ऐसे मन| शुद्ध होआवें गा|* (१५.३५) तसेच आपल्या साधनेची प्रगती कोठवर झाली आहे हे आपल्याला येणारे पारमार्थिक अनुभव दाखवतात ही नैतिक तयारी पू गुरुदेव रानडे सांगतात.
*आत्मा अवतरिते मंत्र|अक्षरी इये|* (१५.५७६)हे फल गीतेने सांगितले आहे ते अंतिम उद्दिष्ट असले तरी आनंद व स्थितप्रज्ञता ह्या गुणांसोबत समता,धैर्य,सहकारवृत्ती,परोपकारता, निर्मत्सरता अशा सामाजिक गुणांचे महत्व पद्माताई कुलकर्णी ठळकपणे समारोपात व्यक्त करतात.ह्या सर्वांचा समुच्यय श्रीज्ञानदेव,श्रीतुकाराम तसेच सर्व संतांच्या जीवनात पाहण्यास मिळतो.अलीकडील काळात पू गुरुदेव रानडे ह्यांचे जीवन जवळून पाहिलेल्या कै बी आर कुलकर्णी आणि पद्माताई कुलकर्णी ह्या भाग्यवान दांपत्याने व्यक्त केलेले *हे प्रचितीचे बोल* सर्वांस उपकारक ठरतील असेच आहेत!हा संपूर्ण ग्रंथ केवळ एकदा नव्हे तर वारंवार वाचावा इतका विद्वत्तापूर्ण,प्रमाणभूत आणि सिद्धांतांनी परिपूर्ण आहे हे पद्माताईंचे ऋण मान्य करावेच लागेल!माझ्या अल्पमतीने, कोणतीही पात्रता नसताना,ग्रंथाचे केलेले शब्दवर्णन हा पू गुरुदेव रानडे, निंबाळ ह्यांच्याविषयीच्या श्रद्धेची एक भावफुलांची ओंजळ आहे!
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.